Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
प्राचार्य डॉ. देवरे आणि प्रा सुर्वे बोरसे यांची ग्रंथसंपदा विद्यापीठ अभ्यासक्रमात..

दि . 27/06/2019

मालेगाव( प्रतिनिधी)-येथील
श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उज्ज्वला देवरे आणि याच महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापक विद्या सुर्वे-बोरसे यांची पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नेमण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये या शैक्षणिक वर्षापासून नविन अभ्यासक्रम सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांना सखोल आणि सर्वस्पर्शी ज्ञान देण्याचा प्रयत्न नव्या अभ्यासक्रमातून दिसून येत आहे. भाषा आणि साहित्याचे नवे अभ्यासक्रम हे नवा विचार करणा-या अभ्यासक संशोधकांना आणि लेखकांच्या साहित्याला न्याय देत आहेत.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम ए मराठीच्या अभ्यासक्रमात मालेगाव येथील सुप्रसिद्ध समीक्षक तथा हिरे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उज्ज्वला देवरे यांच्या ‘स्त्री व्यक्तिरेखा गोनिदांच्या’ या संशोधनाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. ‘प्रादेशिक साहित्य’ या अभ्यासपत्रिके साठी प्राचार्य देवरे यांच्या ग्रंथाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल.
याच महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापक आणि भाषांतरकार प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांनी अनुवादित केलेला ‘होय, तेव्हाही गाणं असेल’ हा बर्टोल्ट ब्रेख्त यांचा कवितासंग्रह ‘भाषांतरीत साहित्य’ या अभ्यासपत्रिके साठी पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. ‘मराठी बालसाहित्यः आकलन आणि आस्वाद’ हा त्यांचा ग्रंथही ‘बालकुमार साहित्य’ या अंतर्गत नेमण्यात आला आहे. या त्यांच्या पुस्तकाला अनेक राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
प्राचार्य डॉ उज्ज्वला देवरे आणि प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांचे ग्रंथ अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल महात्मा गांधी विद्या मंदिरच्या संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.


ताज्या बातम्या