Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनपा पाणी नियोजनामध्ये चुकली ? मालेगाव शहरावर आलेल्या पाणी संकटाला जबाबदार कोण ?

दि . 04/06/2019

मालेगाव मनपा पाणी नियोजनामध्ये चुकली ? मालेगाव शहरावर आलेल्या पाणी संकटाला  जबाबदार कोण ?

पाणी नियोजनाची ऐशीतैशी.तळवाडे आटले तर गिरणा धरणात मुबलक पाणी साठा शिल्लक..

ऐन ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले..

गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झालेला असतानाही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता पाणीकपातीशिवाय गत्यंतर नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. या परिस्थितीत या वेळी मात्र पाण्याचे काटेकोर नियोजन होणे अपेक्षित आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणाधरणात साडे नऊ टक्के तर तळवाडे धरण कोरडेठाक झालं आहे.  त्यामुळे शहरात पाणी कपात होईल असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जाऊ लागले आहे.या बाबतीत मनपाने चनकापूर धारणा चे आवर्तन तळवड्यात येणार नाही तोवर शहराला पाणी पुरवठा होणार नसल्याचे पत्र काढण्यात आले आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून जलसंपदा विभागाकडून त्याबाबत महापालिकेला अवगत करण्यात आले होते. पाणी काटकसरीने वापरावे, ही जलसंपदा विभागाची सूचनाही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्षित केली. धरणातील पाणीसाठा कमी असतानाही त्याचवेळी पाणीकपातीचा निर्णय घेणे अपेक्षित असताना लोकसभा निवडणुकीत फटका बसेल, या भीतीपोटी पाणीकपात करण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र आता पुढील किमान शिल्लक राहिलेलं आवर्तन आणि चांगला पाऊस होई पर्यंत त्रास सहन करावा लागणार आहे. पाणीकपातीचा निर्णय त्याचवेळी घेतला असता तर पाऊसाचे आगमन होईपर्यंत पाणी सर्वाना उपलब्ध  करून देता आले असते.

धरणांची पाणी साठणूवक क्षमता शहराच्या सीमा वाढत असताना आणि भौगोलिक क्षेत्र विस्तारत असताना पाण्याचे मर्यादित प्रमाण लक्षात घेऊन योग्य नियोजन अपेक्षित असते. शहराची लोकसंख्या ७ लाखांच्या पुढे असल्याचा दावा महापालिका करत आहे. यामध्ये शहरात स्थलांतरित होत असलेल्या लोकसंख्येलाही पाणी द्यावे लागते, असा दावाही वाढीव पाणी मिळण्यासाठी केला जातो. शहराला वार्षिक पाणीसाठा मंजूर असून महापालिका वार्षिक तेव्हढे पाणी घेते, ही वस्तुस्थिती महापालिकेचे अधिकारी खासगीत मान्य करतात. 

या परिस्थितीमध्ये वर्षभरासाठीच्या पाण्याचे नियोजन मात्र महापालिकेला करता येत नाही. वितरणातील त्रुटी, पाणीगळती, पाणी चोरी महापालिकेला रोखता आलेली नाही. महापालिकेच्या काही जलकेंद्रातून तर राजरोसपणे पाण्याची चोरी होते. पण राजकीय दबावामुळे त्यावर कारवाई होत नाही.  

 पण या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी शहराला पाणी कमी पडणार नाही, पाणीपुरवठय़ात कपात होणार नाही, अशी भूमिकाच सत्ताधारी पक्षाने घेतली. मालेगाव चे आजी ,माजी आमदार व मनपा च्या सत्ताधाऱ्यांनी सातत्याने तसा दावा केला. पण आता परिस्थिती काय झाली आहे आणि त्याला कोण जबाबदार आहे, याचा खुलासा सत्ताधारी म्हणून  करणे आवश्यक झाले आहे.मनपाच्या अधिकाऱ्यांशी गेल्या दोन दिवसांपासून संपर्क करूनसुद्धा समाधानकारक उत्तर दिले जात नाही.कॅमेरा समोर येऊन बोलण्यास सफसेल नकार दिला जातोय.


ताज्या बातम्या