Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बारा बलुतेदार मंडळाने भागविली हजारोंची तहान; माय-माउलींकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद..

दि . 03/06/2019

संपुर्ण मालेगाव तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करुन तहानलेल्या नागरिकांच्या मदतीला मालेगावातील बारा बलुतेदार मित्र मंडळ धाऊन आले आहे. बारा बलुतेदार मंडळाचे चार टँकर गेल्या वीस दिवसापासून दाभाडी व टेहेरे गावाची तहान भागवत आहेत. भर उन्हात पायपीट करुनही पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकरी, शेतमजुर व कष्टकऱ्यांना मंडळाच्या टॅंकरने मोठा दिलासा दिला आहे. कडक उन्हात पाणी पुरविणाऱ्या बारा बलुतेदार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडुकाका बच्छाव, कमलाकर पवार, त्यांचे सहकारी भुषण बच्छाव, चंदन साेयगावकर, बाला बच्छाव आदींचा दाभाडी, श्रीरामनगर व टेहेरे येथील माता-भगिनींनी शाल, श्रीफळ देऊन आभार मानत सत्कार केला. 
बारा बलुतेदार मंडळाने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जेथे मागणी असेल तेथे टँकर पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत दहा ते बारा गावांना टँकरने पाणी देण्यात आले. यासाठी रोज चार टँकर कार्यरत आहेत. मंडळ स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन दुष्काळाने त्रस्त झालेल्या नागरिकांना पाणी पुरवत आहे. बारागाव पाणी पुरवठा योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे दाभाडीत कधी नव्हती एवढी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मंडळाने दाभाडीच्या श्रीरामनगर येथे आठ दिवसापासून तर गिरणा कारखाना वसाहत, न्यु प्लॉट, बाजारपट्टी, बजरंगवाडी, आदिवासी वस्ती आदी वाड्या-वस्त्यांवर चार दिवसापासून टँकरने पाणीपुरवठा सुरु केला. नागरिकांनी मंडळाला धन्यवाद दिले. श्रीरामनगर येथील महिला सिंधुबाई काकळीज, स्मिता वाघ, भुपाआक्का हिरे आदींनी बंडुकाका बच्छाव, कमलाकर पवार, भुषण बच्छाव आदींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. बारागाव योगनेतून पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकर सुरु ठेवण्याची विनंती केली.
तालुक्यातील टेहेरे येथे बारागाव योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्यापासून पाण्यासाठी ग्रामस्थांची भर उन्हात भटकंती सुरु होती. शासनाचे टॅंकर सुरु असले तरी गावाची दहा हजारापेक्षा अधिक असलेल्या लोकसंख्येला हे पाणी पुरत नव्हते. सरपंच संदीप शेवाळे, प्रभाकर शेवाळे आदींच्या मागणीनुसार टेहेरे येथे मंडळाने स्वखर्चातून २० दिवसपासून रोज चार ते पाच टँकर पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे टेहेरे ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. पाणी पुरविल्याबद्दल गावातील माता-भगिनी अर्चना शेवाळे, शोभा शेवाळे, सुनंदा शेवाळे आदींनी बंडुकाका बच्छाव, कमलाकर पवार, भुषण बच्छाव, चंदन सोयगावकर आदी पदाधिकाऱ्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला. बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे संपुर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची तहान भागविली जात असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले जात आहे.
गोमातेसह जनावरांनाही पाणी
नागरिकांबरोबरच जनावरांचा पाण्याचा प्रश्‍नही तीव्र झाला आहे. दाभाडी येथील गोशाळेला पवन टिबडेवाल यांच्या मागणीनुसार रोज दोन टँकर पाणी पुरविले जात आहे. दाभाडी गोशाळेत ३०० पेक्षा अधिक गायी आहेत. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने गोशाळेतर्फे मंडळाला धन्यवाद देण्यात आले. कुकाणे येथील गोशाळेला रविष मारु व इतर पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार वीस दिवसापासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गोमाता व इतर जनावरांसाठी मागणीनुसार टँकरने विनामुल्य पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडुकाका बच्छाव यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला.


ताज्या बातम्या