Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बोगस डॉक्टरामुळे एकाचा मृत्यू; त्या बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखल.यापूर्वीही याच डॉक्टरवर झाली होती कार्यवाही...

दि . 30/05/2019

मालेगाव आरोग्यविभागा कडून अश्या बोगस डॉक्टरांवर कार्यवाहीची मोहीम सुरू करणार असल्याचे आरोग्य विभागाचे संकेत.मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे.आरोग्यविभागाने यावर तातडीने लक्ष घालावे जेणेकरून मालेगावच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही यासाठी नागरिकांकडून कार्यवाहीची मागणी होत आहे. 


मालेगाव : शहरातील अयोध्यानगर भागात राहणारे विनोद कारभारी वाघ (वय ४१) यांच्यावर बोगस डॉक्टराने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२९) दुपारी घडली. याप्रकरणी संशयित डॉ. रोशन वर्मा (वय ३९, रा. पार्श्वनाथनगर, सोयगाव) यांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शहरातील अयोध्यानगरात राहणाऱ्या विनोद वाघ (वय ४२) यांना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छातीत दुखत असल्याने परिसरात गेल्या १२ वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. रोशन वर्मा यांना उपचारासाठी बोलविले होते. वर्मा यांनी ॲसिडिटीचा त्रास असल्याचे सांगून दोन इंजेक्शन देऊन वाघ यांना गोळ्या दिल्या. मात्र, थोड्याच वेळात वाघ यांना छातीत तीव्र वेदना होत असल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाघ यांचे पुतणे गणेश निवृत्ती खैरनार यांनी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची खबर दिली.
वर्मा यांना पोलीस ठाण्यात बोलावून  घेतले तेव्हा वर्मा यांनी रुग्ण वाघ यांच्यावर केलेल्या उपचारांची माहिती दिली असून स्वत:कडे बीईएमएस, डीएनवायएस पदवी असल्याचे सांगून गेल्या १२ वर्षांपासून 'रामाई क्लिनिक' नावाचे रुग्णालय चालवित असल्याचे सांगितले. पोलीसांनी याप्रकरणी आरोग्य अधिकारी यांना याबाबत माहिती देत डॉक्टरचा परवाना व रुग्णालय चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. भीमराव त्रिभुवन यांनी पोलीस व पथकासह रमाई क्लिनिकमध्ये सायंकाळी सहा वाजता जाऊन पाहणी केली. रुग्णालयात विनापरवाना औषध, इंजेक्शनचा साठा व वैद्यकीय उपचाराचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले आाहे.  अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा पंचनामा करून सील केला. याप्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. सायका मलिक यांच्या तक्रारीवरून बोगस डॉ. रोशन वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. 


ताज्या बातम्या