Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तापते मालेगाव !

दि . 26/05/2019

प्रा.जितेंद्र व्ही. मिसर

भूगोल विभाग प्रमुख,

“आम्ही मालेगावकर” हे म्हणताना आनंद वाटावा असेच आमचे मालेगावआहे. जितका एका पुणेकराला आनंद वाटावा तितकाच एका मालेगावकराला “आम्ही मालेगावकर” म्हणताना होतो. नाशिक जिल्यातील मालेगाव शहर बऱ्याच कारणांनी प्रसिद्ध आहे. त्यात बहुधर्मिय लोक एकत्र राहणारे, वस्र उद्योगात अग्रेसर, बॉलीवूड नंतर मॉलीवूड म्हणून प्रसिद्ध, भुईकोट किल्ला, अनेक लघुउद्योग असून अशा बऱ्याच चांगल्या- वाईट कारणानी प्रसिद्ध असलेल्या मालेगावची आणखी एका कारणाने नवी ओळख तयार होतेय, ती म्हणजे सर्वात उष्ण आणि प्रदूषित शहर. आम्ही मालेगावकर म्हणणाऱ्याना उन्हाळ्यात एका वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते ते म्हणजे मालेगावातील वाढते तापमान. दरवषी मालेगावातील तापमान एक नवा उच्चांक स्थापन करतोय अन शहराचे नाव देशभर प्रसिद्ध होतोय. महाराष्टात चंद्रपूर आणि नागपूर नंतरचे सर्वात उष्ण शहर म्हणून मालेगावची नवी ओळख तयार होत आहे. आणि दिवसेदिवस ही समस्या उग्र स्वरूप धारण करत आहे, हे कुठल्याच मालेगावाकाराला नकोय. दरवर्षी जवळपास ४५ सेल्सियस पर्यंत जाणाऱ्या तापमानामुळे प्रत्येक मालेगावकर हैराण झालेला दिसून येतोय.

मात्र फक्त उन्हाळा आला म्हणून मालेगावातील तापमान वाढत का? कारण उन्हाळा एकाच वेळेस सर्वत्र असताना फक्त मालेगावात नवनवे उच्चांक का? याच्या मागे काही कारणे आहेत का?  ते देखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे. त्याच अनुषगाने आढावा घेतलेला हा एक लेख.

मालेगावचा इतिहास बघता हे शहर किल्याच्या निर्मितीपासून ह्या शहराची खरी सुरुवात झाली. हैद्राबाद आणि वाराणसीतून आलेल्या मुस्लीम बहुल लोकांनी केलेले स्थलांतर यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला रोजगार म्हणून हातमाग आणि बऱ्याच लघु उद्योगाची निर्मिती मालेगावात झाली. त्यातच नाशिक जिल्यातील नाशिक नंतरचे सर्वात मोठे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे बरीच ग्रामीण लोकसंख्या शहरावर अवलंबून आहे, त्यामुळे सेवा क्षेत्रात देखील तेवढेच प्रगत शहर आहे. सर्व शैक्षणिक सुविधा, बँक, वैदकीय सेवा, रोजगार, कृषी बाजारपेठ इ.सर्वसोयी सुविधांमुळे मालेगाव शहर वाढतच गेले. मात्र या सर्व क्षेत्रात भरभराट होत असताना मालेगाव मात्र आजच्या स्थितीत विद्रूप अवस्था धारण करत आहे. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतसे शहर फोफावत गेले. शहरात असलेले लहान मोठे उद्योग आणि त्यासाठी बाहेरून आलेले निर्वासित यांनी मिळेल त्याठिकाणी राहावयास सुरुवात केली अन त्यातून मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे अपुऱ्या आरोग्य सुविधा, गचाळ वस्ती, अपुरे पिण्यायोग्य पाणी, शिक्षणाचा अभाव, गुन्हे यातून एक वेगळेच मालेगाव दिवसेदिवस उदयास येत आहे. आणि एके काळी समृद्ध मालेगाव आज विद्रूप अवस्थेत दिसून येत आहे.

या सर्व प्रश्नांचा शोध घेतल्यास प्रकर्षाने जाणवलेली एक घोष्ट म्हणजे वाढते शहरीकरण अन त्या तुलनेने अपुरे असलेले शहरी नियोजन. मालेगावातील चालणारे लहान मोठे उद्योग आणि हे सर्व उद्योग बर्याच अशी मालेगाव शहरातच नागरी वस्तीत वसलेले आहेत. त्यात प्रामुख्याने लूम उद्योग (हातमाग), प्लास्टिक कारखाने, पाईप उद्योग, साबण उद्योग, लुंगी व्यवसाय, कचरा उद्योग या सारख्या उद्योगांचा समावेश होतो. महाराष्ट्रातून प्लास्टिक कचरा मालेगावात मोठ्या प्रमाणात पुनर्प्रक्रियासाठी येतो. या सर्व उद्योगातून बाहेर पडणारे प्रदूषित वायू हे प्रत्यक्षपणे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत.

त्यातच आणखी एक भर म्हणजे शहरातील वाढलेल्या वाहनाची वाढलेली संख्या आणि त्या तुलनेने अपुरे व नियोजन शून्य रस्ते. मालेगावात रिंग रोडची सोय नसल्यामुळे सर्व वाहने शहरात प्रवेश करतात त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतुकीची होणारी कोंडी दिवसेदिवस समस्या गंभीर रूप घेत आहे. मालेगाव  शहरात येणारी वाहने आणि शहरातून बाहेर जाणारी वाहने खूप संथ गतीने होते, साहजिकच अश्या वाहनातून बाहेर पडणारा धूर आणि प्रदूषित वायू यामुळे शहरातील प्रदूषणात आणखी भर पडते. शहराच्या मध्यवर्ती भागात कासवगतीने चालू असलेले उड्डाण पुलाचे काम त्यामुळे पुलाशेजारून असलेला कच्चा रस्त्यावरून होणारी संथ वाहतूक त्यातून प्रदूषणात भर पडत आहे. सहाजिकच कारखाने आणि वाहने यातून बाहेर पडणारे कार्बन डायऑक्ससाइड, सल्फर डायऑक्ससाइड, कार्बन मोनाऑक्ससाइड या सारखे घातक वायू बाहेर पडतात. हरितवायूचे पर्यावरणीयदृष्ट्या खूप महत्व आहे, त्यामुळे वातावरणातील तापमान संतुलित राहत असते. मात्र ह्याच वायूंच प्रमाण वाढल्यास शहरातील उष्णता बाहेर न पडता शहरी तापमान वाढ होण्यास मदत होत असते. मालेगाव शहरातील प्रदूषणामुळे ग्यास चेम्बर तयार होऊन तापमान वाढ झाली. ह्या सर्व प्रदूषणाच्या मानाने मालेगावातील असलेले वृक्षांची संख्या फारच कमी आहे आणि दिवसेदिवस रस्ते आणि नागरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे.  

तसेच मालेगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी चणकापूर धरणातील पाणी कालव्यामार्गे लेंडी धरणात आणले जाते आणि तिथून मालेगावात. हेच पाणी कधी एके काळी शेतीसाठी वापरले जात असे त्यामुळे परिसरातील शेती सुजलाम अन सुफलाम होती आणि त्यामुळे परिसरातील गारवा असायचा. मात्र आता शेती ही कोरडवाहू राहू लागली, अन साहजिकच त्याचा परिणाम शहर  तापमान वाढीस झाला.

मालेगाव शहरातील जवळपास सात लाख लोकसंख्या आहे. हे शहर फक्त ३० चौ.किमी.  क्षेत्रात पसरलेले आहे. त्यामुळे सर्वाधिक घनतेचे शहर म्हणून नवी ओळख तयार होत आहे.  महानगरपालिका असलेले शहर आणि त्यामानाने असलेले अपुरे शहरी नियोजन. मालेगावात आजही इमारतींचे बांधकाम होताना सगळे नियम धाब्यावर बसवून केले जातात. मालेगाव शहरात बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य हे देखील पर्यावरण पूरक नाहीय. उष्णता शोषून घेणारे बांधकामामुळे शहरातील होणारे तापमान वाढ ही झपाट्याने होताना दिसते. इमारतीमध्ये कुठ्ल्याचे प्रकारचे अंतर न ठेवता बांधकाम, वृक्षांची आणि गार्डनची  संख्या कमी, सगळीकडे असलेले सिमेंटची जंगले ह्या समस्या देखील प्रामुख्याने तापमान वाढीस हातभार लावतात.  घरांभोवती, रस्त्यांना लागून आणि लहान मोठ्या उद्योग शेजारी मोठ्या प्रमाणत वृक्षांची लागवड करणे बंधनंकारक करणे गरजेचे आहे. सूर्यकिरण परावर्तीत होणारे साहित्य व हिरवे छत ही संकल्पना राबवल्यास शहरातील उष्णता जवळपास ३०% कमी केली जाऊ शकते. वृक्षांची लागवड केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. विशिष्ट अंतरावर बागबगिच्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे. सहाजिकच त्यातूने उष्णतेचे शोषण केले जाईल, अन तापमान कमी होण्यास मदत होईल.

एकीकडे भारतात १०० स्मार्ट शहर उभारणीचा कार्यक्रम उत्साहात पर पडतो अन त्यासाठी ९८० हजार कोटींची तरतूद होत असताना मात्र ह्यात मालेगाव सारखी शहरे पूर्णपणे दुर्लक्षित आहेत.  मोठी  शहरे सुधारत असताना लहान शहराकडे होत असलेले दुर्लक्ष उद्या गंभीर स्वरूप धारण करतील यात शंका नाही.  आजही मालेगाव सारखे बरीच शहरे देशभरात निर्माण होत आहे. मालेगावातील आरोग्य समस्या दिवसेदिवस गंभीर रूप घेत आहे. कार्बन डायऑक्ससाइड वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने परिस करार  (Paris convention) सह्या केलेल्या असताना ह्या सर्व उपाय योजना फक्त कागदावरच आहेत. वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे तापमान वाढ होत आहे आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम नागरिकावर होत आहे. उष्माघात,त्वचेचे विकार, दमा, घटते आयुर्मान ह्या सारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यासाठी करण्यात येणारे उपाययोजनचा मात्र अभाव आहे. ह्या सर्व गोष्टी कडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अश्या अनेक समस्या असल्या तरीही मालेगावकर या सगळ्या समस्यांना तोंड देत “आलीया भोगाशी” म्हणून आनंदाने जीवन जगत आहे.

ह्यासाठी सर्व स्थानिक प्रशासन व नागरिकांनी एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. लोकसहभागातून जनजागृती करणे, मोठा प्रमाणत वृक्ष लागवड करणे, पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवणे, वृक्ष दिंडीतून वृक्ष लागवडीचे महत्व सजवून सांगणे. यात मालेगावातील तरुआई संस्थेने वृक्षलागवडीत घेतलेल्या  पुढाकाराचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. खालील उपाय योजना झाल्यास निश्चितच एक वेगळा मालेगाव बघावयास मिळेल.

उपाय:

 • शहरातील सर्व लहान मोठे उद्योग शहराबाहेर हलवणे.
 • शहरातील रस्ते रुंद करणे.
 • शहरालगत रिंगरोड तयार करणे.
 • आवश्यक त्या ठिकाणी उड्डाण पुलाची निर्मिती करणे.
 • बाजार पेठेचे विकेंद्रीकरण करणे.
 • शहराबाहेर नवीन उपनगरची स्थापना करणे.
 • वृक्षाची मोठ्या प्रमाणत लागवड करणे.
 • बांधकामात वापरले जाणारे साहित्य हे पर्यावरण पूरक असावे.
 • घराशेजारी मोकळ्या जागेत वृक्षलागवड करणे.
 • हिरवे छत (Green culture)ही संकल्पना राबवणे.
 • सांडपाण्याचे योग्य नियोजन करणे.
 • ठीकठिकाणी गार्डन तयार करणे.
 • शहरातील धुरयुक्त वाहनाची तपासणी करणे.
 • सिग्नल ची सोय करणे.
 • शहराच्या मध्यवर्ती भागात वन वे तयार करणे.

 

 • लोकसहभागातून पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवणे.
लेखक---

प्रा.जितेंद्र व्ही. मिसर

भूगोल विभाग प्रमुख,

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव,

(ता.मालेगाव (नाशिक


ताज्या बातम्या