Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आराई येथील युवा ग्रामपंचायत सदस्यांनी बंधाऱ्यातील गाळ उपसण्यासाठी स्वखर्चाने घेतला पुढाकार.. 

दि . 16/05/2019

सटाणा :तालुक्यातील आराई येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल आहिरे व धिरज सोनवणे या दोघांनी स्वखर्चाने गावाजवळील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यातील गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.गेल्या दोन दिवसात पन्नास एक ट्रॉली गाळ उपसण्यात आला असून त्यामुळे या बंधार्‍याची साठवण क्षमता वाढून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. गावाजवळून  वाहणाऱ्या आरम नदीवर  शिवारात एक ब्रिटीशकालीन बंधारा आहे.या बंधाऱ्यात वर्षानुवर्षापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.त्यामुळे नदीला पाणी येऊनही  समाधानकारक पाणीसाठा होत नाही.त्यामुळे या बंधार्‍यातील गाळ उपसा करून पाण्याची साठवण क्षमता वाढावी याबाबत मागणी होती.  परंतु त्याबाबत शासन स्तरावरून किंवा गाव पातळीवरून कुणी पुढाकार घेत नव्हते.अशा पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीत निवडून आलेले तरुण सदस्य राहुल आहिरे व धिरज सोनवणे  यांनी वैयक्तिक पुढाकार घेतला.त्यांनी पदरमोड करून भाडेतत्त्वावर जेसीबी आणून मंगळवारी (दि.१४)गाळ उपसण्यास सुरुवात केली. जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्याचे आवाहन केल्यानंतर त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.याबाबत प्रांत अधिकारी  प्रवीण महाजन व तहसीलदार जितेंद्र इंगळे  यांनीही या जोडगोळीचे कौतुक केले.या  बंधाऱ्यातील जास्तीत जास्त गाळ बाहेर काढल्यावर भर असून आणखी काही दिवस हे काम चालू ठेवण्याचा निर्धार त्या दोन्ही ग्रा.प.सदस्यांनी व्यक्त केला आहे. या बंधार्‍यातील गाळ उपसा झाल्यानंतर त्याची साठवण क्षमता वाढणार आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उपलब्ध होणार असून या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.


ताज्या बातम्या