Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
हतबल संकटमोचक पालकमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा काय ?

दि . 07/05/2019

अधिकारी ऐकत नाही, दुष्काळ दौऱ्यात मंत्री गिरीश महाजनांची हतबलता ....
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सहा आकडी पगार घेणारे अधिकाऱी, मंत्र्यांचही ऐकत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना वठणीवर कुणी आणायचं?. हा सवाल विचारण्यामागचं कारण म्हणजे अधिकारी आमचं ऐकत नाही असं रडगाणं खुद्द गिरीश महाजन यांनी गायलंय. विशेष म्हणजे आचारसंहिता उठवलेली असतानाही अधिकारी आचारसंहितेचं कारण देताहेत. अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याऐवजी त्यांची सबब देणं कितपत योग्य आहे असा विचार मंत्र्यांनीही करायला हवा.. कारण शेवटी प्रश्न तुमचं आमचं पोट भरणाऱ्या बळीराजाचा आहे.

मालेगाव: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दुष्काळ दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी यासंदर्भातील उपाययोजनांना गती देण्यासह पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात आढावा घेण्याचे निर्देश यात दिले आहेत. या निर्देशानंतर मंत्र्यांनी देखील दौऱ्यांना सुरुवात केली आहे.

मात्र या दौऱ्यांचे नियोजन योग्य होत नसल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचा काल जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव येथे दुष्काळी दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र दौरा पूर्ण करताना नांदगाव तालुक्यात येण्यास रात्री उशिर झाल्याने अखेर दौरा अर्धवट सोडून पालकमंत्री नाशिककडे निघून गेले. यामुळे पालकमंत्र्यांची वाट पाहात बसलेल्या नांदगावच्या हिसवळ येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या नाशिकच्या पालकमंत्र्यांनी सिन्नर येथून सकाळी दौऱ्याची सुरुवात केली. मात्र त्यानंतर येवल्यात पोहोचायला त्यांना दुपार उलटून गेली. दुपारी चारच्या दरम्यान नांदगावच्या हिसवळ बुद्रुक गावातील दुष्काळग्रस्त नागरिकांशी त्यांची भेट ठरलेली होती. यासाठी संध्याकाळपासून परिसरातील सात ते आठ गावातील नागरिक त्यांच्या भेटीसाठी वाट पाहात थांबले होते. गावातील मंदिरात तशी तयारी करण्यात आली होती.
मात्र उशिर झाल्यामुळे पालकमंत्री हिसवळ येथे येणार नसल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिल्याने या ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली.
गावात जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची भीषण परिस्थिती असताना आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आतूर झालेल्या गावकऱ्यांना पालकमंत्री येणार नसल्याचं समजल्यावर चांगलाच हिरमोड झाला आणि तीव्र नाराजीही व्यक्त केली. नांदगाव-मनमाड रस्त्यावर असलेल्या या गावावरुन पालकमंत्र्यांचा जत्था नाशिककडे गेल्याने राजकीय संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालकमंत्र्यानी जनतेचे संकट ओळखले नाही, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

 

 


ताज्या बातम्या