Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जिल्हाबँकेने शेतकऱ्यांकडून होणारी सक्तीची वसुली थांबवावी..

दि . 04/05/2019

मालेगाव : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सक्तीची कर्ज वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने तालुका उपनिबंधक सोमेश्वर बरनाले यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
               महाराष्ट्रात मागील दोन तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. शेतात विहिरीला पाणी नाही, गावागावात शासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, जनावरांना चारा पाणी उपलब्ध होत नसल्याने विविध ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात येत आहेत. जिल्यात सततच्या नापिकीला कंटाळून कर्जच्या बोज्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. अश्या भयंकर दुष्काळी परिस्थितीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने प्रभावशाली कर्जदार शेतकऱ्यांच्या तारण शेतजमिनीचा लिलाव करण्याची सुरवात केली आहे. 
            नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड दडपण आले आहे. पहिलेच दुष्काळात होरपळत असताना शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजना फसलेली असताना कर्ज कसे फेडायचे, संसार कसा चालवायचा, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न कसे करायचे या विवंचनेत तो कसा तरी मार्ग काढत येणाऱ्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडून पीकपाणी पिकेल अश्या आशेवर दिवस काढत आहे. यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सक्तीची कर्जवसुली त्याला आत्महत्येस प्रवृत्त करु शकते. 
             शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत मदतीचा हात देण्याचा सोडून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करणे अतिशय संतापजनक आहे. प्रभावशाली शेतकरी कर्जदार हा नवीन निकष कसा लावला गेला ? ज्या संस्था ,कारखाने यांच्याकडे करोडो रुपयांची थकबाकी आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली, त्यांची प्रॉपर्टी लिलाव करून बँक उर्जितावस्था निर्माण करत शेतकऱ्यांना मदत करण्याचे सोडून सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची जमीन लिलाव करण्याचे पाप जिल्हा बँक संचालक मंडळ करत आहे ते तात्काळ थांबवावे अशी मागणी केली असून सक्तीची कर्ज वसुली न थांबविल्यास शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल, या सक्तीच्या कर्जवसुलीमुळे एकाद्या शेतकऱ्याने आपल्या जीवाचे बरे वाईट केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची व जिल्हा बँक संचालक मंडळची असेल याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे. यावेळी आम्ही मालेगावकरचे निखिल पवार, प्रा.के.एन. आहिरे, देवा पाटील, विवेक वारुळे, अमोल निकम, अविनाश निकम, बाळासाहेब शिरसाठ, संजय खैरनार, दादा बहिरम, शरद पवार, जयेश आहिरे, सुशांत कुलकर्णी, अक्षय पवार, गणेश जंगम, कपिल डांगचे, ज्ञानेश सोनवणे, तानाजी पवार आदिनी केली आहे.


ताज्या बातम्या