Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मोसमनदी पात्रात साडेपाच महिन्यांचे अर्भक सापडल्याने शहरात गर्भलिंग तपासणीचे रॅकेट असल्याची चर्चा...

दि . 02/05/2019

मालेगाव : राज्यभरात एकीकडे स्त्री जन्माचे सर्वत्र स्वागत होत असताना मालेगाव शहरात मात्र वारंवार अनधिकृत गर्भपाताच्या घटना उघड होत आहेत. गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या मोसम नदीपात्रात साडेपाच महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

यापूर्वीदेखील मालेगाव शहरात गर्भलिंग तपासणीचे रॅकेट असल्याची चर्चा होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी कौळाणे शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतरीत्या गर्भपात केला जात असल्याचेही समोर आले होते. गर्भपात करण्यासाठी राज्यभरातून काही नागरिक मालेगावात येत असल्याने, मालेगाव शहरातील आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मोसम नदीपात्रात एका कापडी पिशवीजवळ कुत्र्यांची गर्दी झाल्याचे स्थानिक नागरिकांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी नदीपात्रात उतरून पिशवी उघडून बघितली असता, त्यात साडेपाच महिन्यांचे अर्भक असल्याचे निष्पन्न झाले. नागरिकांनी तत्काळ पोलीस व आरोग्य यंत्रणेला याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन ते अर्भक ताब्यात घेतले. आरोग्य विभागाने तपासणी केली असता, ते स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे, मालेगाव शहरात गर्भपात करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने येथील आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


ताज्या बातम्या