Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वडगाव येथे शेतकरी आत्महत्या

दि . 26/04/2019

मालेगाव - गेले तीन वर्ष सततची नापिकी,शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा वाढता डोंगर, आजारपण व प्रापंचिक चिंता यामुळे वैफल्यग्रस्त होत तालुक्यातील वडगाव येथिल प्रकाश विठ्ठल ठोके (५८) या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान झालेल्या या घटनेची पोलीस व महसूल प्रशासनाने दखल घेतली आहे.
  तालुक्यातील शेती व शेती व्यवसाय दिवसेंदिवस डबघाईस जात आहे. शासनाकडून कर्जमाफीचे मिळालेले पोकळ आश्वासन, शेतीमालाला मिळणारा अल्प बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च यात शेतकरी वर्गाची मोठी ससेहोलपट होत असल्याने तालुक्यात सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रकाश ठोके याचे नावावर वडगाव येथे दोन एकर शेती आहे. मात्र गेले तीन वर्ष त्यांना शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही. ते शेती साठी घेतलेले कर्जही फेडण्यास असमर्थ ठरले होते. त्यांनी स्थानिक सोसायटी कडून घेतलेल्या कर्जापोटी अपेक्षित असलेल्या कर्जमाफीचा लाभही त्यांना मिळाला नव्हता. त्यात त्यांना आजरपणानेही त्रस्त केले होते. आजारपणातील वाढत्या वैद्यकिय खर्चाची पूर्तता करणे त्याना अवघड झाले होते. मुलाची बेरोजगारी,मुलीच्या लग्नाची चिंता त्याला सतत भेडसावत होती. याच वैफल्यग्रस्त अवस्थेत त्याने बुधवारी रात्री घरातील सदस्य विवाह सोहळ्यास गेले असता ओढणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
  प्रकाशवर सहकारी सोसायटी तसेच आजारपणासाठी घेतलेले वैयक्तीक असे सुमारे तीन लाख रुपयांचे कर्ज आहे.महसूल व पोलीस यंत्रणेने याची दखल घेतली आहे. तलाठी च॔द्रकांत महाले  सोसायटीचे  सचिव  नानाजी आहिरे यांनी पंचनामा केला. वडनेर खाकुडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. तालुक्यात सलग होणाऱ्या या शेतकरी आत्महत्या सत्रामुळे शेती व शेतकऱ्याची व्यथा पुन्हा समोर आली आहे.


ताज्या बातम्या