Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुख्यमंत्र्यांचा सुचनेवरुन पर्यटनमंत्र्यांकडून गायकवाड गटाची मनधरणी..

दि . 19/04/2019

मालेगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी मालेगावचा खास दौरा करित भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांची भेट घेतली. मतभेद बाजुला सारुन राष्ट्रवादाने प्रेरित होऊन प्रचारकार्यात सक्रीय होण्याचे आवाहन त्यांनी केले.

पदाधिकारी खांदेपालटामुळे मालेगाव शहर व तालुक्यात भाजप पक्षसंघटनेत किंतु-परंतुची स्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच माजी महानगर जिल्हाध्यक्ष गायकवाड यांचा गट धुळेऐवजी जळगाव लोकसभा मतदार संघातील प्रचारात सक्रीय झाला होता. स्थानिक पातळीवरील प्रचारात काहीसी भाजप पिछाडीवर जात असल्याची बाब पक्षश्रेष्ठींच्या कानावर गेली. राज्यस्तरीय आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सदरचा विषय गेल्यानंतर त्यांचा संदेश घेऊन शुक्रवारी पर्यटनमंत्री रावल हे मालेगावी आले होते. सटाणा नाका येथील गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात भाजप नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधत यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. विकासकामांच्या जोरावर बळकट स्थितीत पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी कधी नव्हे तर देशभरातील विरोधक एकत्र आलेत. देशच नव्हे तर पाकिस्तान आणि चीनमधूनदेखील मोदीविरोधी कारवाया होत आहेत. अशा परिस्थितीत देशहित जोपासण्यासाठी मतभेद सोडून कामाला लागण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा दाखला देऊन एक खासदार कमी पडल्याने भाजपचे सरकार गेले. देशाची मोठी हानी झाली. एक मत आणि एक खासदार यांस अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पंतप्रधान मोदींचा विजयरथ दौडत राहण्यासाठी सक्रीय व्हा, अशी साद रावल यांनी घातली.

व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा अन् पक्षापेक्षा देश मोठा. देशाच्या सिमांवरील सैनिकाप्रमाणेच पक्ष कार्यकर्त्याला महत्व आहे. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना वाव न देण्याची गरजही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

तर, भाजपचे गटनेते सुनिल गायकवाड यांनी पक्षनिष्ठेला प्रमाण मानून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच जळगाव मतदार संघात प्रचाराची धुरा सांभाळली. आपल्या मनात कोणत्याही प्रकारे किंतु-परंतु नाही. पक्षाने प्रचारासाठी समन्वयक द्यावा, पक्षाचे कार्य आणि ध्येयधोरण जनमाणसात पोहोचविण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी काही सुचना मांडल्या. त्यांचा स्वीकार करित रावल यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी सुनिल गायकवाड यांचे समर्थक उपस्थित होते.


ताज्या बातम्या