Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार

दि . 15/04/2019

उष्णतेमुळं सर्वसामान्यांचे हाल होत असतानाच तसेच पावसाअभावी शेतीचं काय होणार अशी टांगती तलवार डोक्यावर असताना, भारतीय हवामान खात्यानं दिलासा दिला आहे. सोमवारी यंदाच्या पावसाळ्याबद्दल भाकीत वर्तवताना भारतीय हवामान खात्यानं सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाचा अंदाज खासगी संस्थांनी वर्तवल्यानं चिंतेचं वातावरण होतं. परंतु चिंतेचे हे ढग भारतीय हवामान खात्याच्या अंदाजामुळे दूर होण्यास मदत होणार आहे.

अल निनोच्या तीव्रतेमुळे दुष्काळी परिस्थिती ओढवण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, यातून दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान खात्यानं नमूद केलं आहे की, अल निनोची पडछाया जरी कायम असली तरी त्याची तीव्रता येत्या काही महिन्यात कमी होणार आहे. जुलै व ऑगस्ट या महिन्यांमध्ये अल निनोची तीव्रता खूपच कमी झालेली असेल, त्यामुळे या काळात भारतात चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. अल निनोचा प्रभाव जास्त असल्यास पावसाचे प्रमाण कमी असते. अल निनोचा प्रभाव जोखून त्याआधारे पाऊस किती पडेल याचा अंदाज वर्तवण्यात येतो. अल निनो खूप प्रभावी असल्यास कोरड्या दुष्काळाची भीती असते. अल निनोचा प्रभाव जितका कमी तितका चांगला पाऊस पडेल असे भाकीत वर्तवण्यात येते.

अल निनोचा सध्या प्रभाव असला, तरी येत्या एक ते दोन महिन्यांत तो ओसरणार असल्याचा अंदाज असून त्यामुळे भारतात कोरड दुष्काळ तर पडणार नाहीच, उलट सरासरीच्या जवळ जाण्याइतका पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.


ताज्या बातम्या