Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दणका, औद्योगिक वाढ शून्यावर

दि . 12/04/2019

नवी दिल्ली, 12 एप्रिल : भारताच्या औद्योगिक उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा दर जवळजवळ शून्यावर आला आहे. गेल्या 20 महिन्यांतला हा नीचांक आहे. त्याचवेळी महागाईमध्ये मात्र वाढ झाली आहे. महागाईचा दर 2.57 वरून 2.86 वर गेला आहे. 

अनेक क्षेत्रात उत्पादन घटल्यामुळे औद्योगिक वाढीचा दर खालावला आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी औद्योगिक उत्पादनाचा दर वाढता असणं महत्त्वाचं असतं. खाणकाम, कारखान्यांमधलं उत्पादन, वीजनिर्मिती या क्षेत्रांत आपण किती प्रगती केली याचं मोजमाप या वाढीमध्ये धरलं जातं.

कधी वधारणार दर?

देशाच्या औद्योगिक वाढीमध्ये घट असल्याचा अंदाज होताच पण ही वाढ अगदी शून्याच्या जवळ येईल,असं वाटत नव्हतं, असं मार्केट तज्ज्ञ अजय बग्गा यांचं म्हणणं आहे. वाहनांची विक्री कमी झाल्यानेही याचा परिणाम आर्थिक वाढीवर झाला आहे.

निवडणुकांनंतर नवं सरकार आल्यावर धोरणांवर काम सुरू होईल. त्यानंतर पुन्हा एकदा हा दर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पण सध्या तरी काही महिने औद्योगिक दर हाच राहील,असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले तर उद्योगांना थोडा दिलासा मिळू शकेल, असंही त्यांना वाटतं आहे. 

शेअर बाजार कोसळण्याची शक्यता 

 

औद्योगिक वाढीचा दर खालावल्याने शेअर बाजार कोसळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांवर याचा परिणाम होणार आहे. 

नोटबंदीचा परिणाम देशातल्या उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थेवर झाला, अशी आकडेवारी आहे. त्यातच घटलेलं औद्योगिक उत्पादन आणि वाढलेली महागाई ही नव्या सरकारसमोरची आव्हानं असणार आहेत. 

(ibn)


ताज्या बातम्या