Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळे लोकसभेसाठी ३२ उमेदवार त्यात २५ अपक्ष ..

दि . 10/04/2019

मालेगाव - धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. २ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती मात्र सर्वच प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या दोन दिवसात मोठे शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. धुळे लोकसभेसाठी एकूण ३६ उमेदवारांनी ४६ अर्ज दाखल केले होते. त्यात बुधवारी छाननीत ५ उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले असून आता ३२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्थात शुक्रवारी माघारी नंतरच किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार हे स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची संख्या किती असेल याचा निर्णय माघारीनंतर होणार असला तरी प्रमुख लढत भाजपचे डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. दोन्ही बाबांच्या या लढतीत भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे तर वंचित बहुजन आघाडीकडून कमाल हसीम व नबी अहमद या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या लढाईत अधिक चुरस निर्माण झाल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळे या प्रमुख उमेदवारांसह अनेक उमेदवार आपले भवितव्य अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दि. ११ व १२ एप्रिल रोजी अर्ज माघारीची मुदत आहे. दरम्यान बुधवारी अर्ज छाननीत ५ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. यात चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत तर एक अर्ज राहुल सुभाष भामरे यांचा आहे. भाजपकडून त्यांनी अर्ज दाखल केला होता मात्र भाजपकडून डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी निश्चित झाल्याने राहुल भामरे यांचा अर्ज केवळ अपक्ष उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यामुळे माघारीपुर्वी धुळे लोकसभेसाठी ३२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नेहमीच अपक्ष उमेदवार चर्चेत राहतात. यंदादेखील धुळे लोकसभेसाठी सुमारे २५ इच्छुकांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यातील चार अर्ज अवैध ठरले असले तरी अद्याप २१ अपक्ष उमेदवार रिंगणात कायम आहेत. त्यामुळे माघारीच्या दिवशी यातील किती उमेदवार अर्ज मागे हे पाहणे औत्सुक्याचे असेल. राजकीय पक्षामध्ये देखील भाजप, कॉंग्रेस व वंचित आघाडी व्यतिरिक्त बळीराजा पार्टी, भारतीय मायन्यूरिटी सुरक्षा पार्टी, बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिक सोशिओलिस्ट पार्टी, बहुजन महा पार्टी, राष्ट्रीय जनसेना पार्टी, राष्ट्रीय मराठा पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन किसान पार्टी अशा नवख्या पक्षांनी देखील उमेदवार दिले आहेत.
उदंड झाले अपक्ष !


ताज्या बातम्या