Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अनिल गोटे यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, सुभाष भामरेंच्या विरोधात लढणार लोकसभा

दि . 08/04/2019

 

 अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून भाजपलाही सोडचिठ्ठी दिली आहे. धुळे मनपा निवडणुकीपासून नाराज असलेल्या अनिल गोटेंनी सोमवारी आमदारकी तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मी मोदी समर्थकच आहे, परंतु मोदींच्या नावाने वाईट कामे करणाऱ्यांना विरोध असल्याचे गोटे म्हणाले. आमदारकीचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर अनिल गोटेंनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर टीका केली. भाजपमधील पक्षांतर्गत राजकारणाचा कंटाळा आल्याचे ते म्हणाले. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे गोटे म्हणाले. गोटे यांनी यापूर्वी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली आहे. आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे.

धुळे मनपाच्या निवडणुकीत सुभाष भामरेंनी गोटेंना बाजूला सारले होते. यानंतर गोटे-भामरे वाद टोकाला गेला होता. आता माझे एकच लक्ष्य असेल, ते म्हणजे सुभाष भामरे, असे गोटे म्हणाले. यामुळेच आता लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्याविरुद्ध लढण्याचे आपण ठरवले असल्याचे ते म्हणाले. गोटेंच्या या पवित्र्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भामरे वि. गोटे वि. काँग्रेसचे कुणाल पाटील अशी तिहेरी लढत रंगणार आहे.


ताज्या बातम्या