Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आरोग्य अधिकारी डॉ.डांगे यांचा पदभार काढला; मनपा रुग्णालयांचा होता अतिरिक्त कार्यभार..

दि . 28/03/2019

मालेगाव- महानगरपालिका पालिकेच्या आरोग्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर डांगे यांच्याकडे देण्यात आलेला होता. सामान्य रुग्णालयात व मनपा आरोग्य अधिकारी अशी दुहेरी जबाबदारी असलेल्या डॉ. डांगे यांना यामुळे नेहमीच नगरसेवक, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. अखेर त्यांच्याकडे असलेला महापालिकेचा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अखेर काढण्यात आला आहे. मंगळवारी आयुक्त किशोर बोर्डे यांनी तसे आदेश काढले आहेत.

डॉ.डांगे यांचा पदभार डॉ.अन्सारी सायका जबीन अब्दुल मलिक यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेला आता पूर्णवेळ आरोग्य अधिकारी मिळाले आहेत.पालिकेने काढलेल्या आदेशात मालेगाव महानगरपालिकेसाठी डॉ.डांगे पुर्णवेळ देऊ शकत नसल्याने व मालेगाव महानगरपालिका हद्दीतील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरविणेकामी स्वतंत्र पुर्णवेळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी असणे आवश्यक
असल्याने डॉ.अन्सारी यांच्याकडे  पदभार सोपवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

सामान्य रुग्णालय व पालिकेचे आरोग्य अधिकारी अशी दोघे पद सांभाळताना डॉ. डांगे यांच्याबाबतीत अनेकवेळा वादाचे प्रसंग उभे राहत होते. परंतु जाहिरात देऊन देखील पालिकेच्या आरोग्य अधिकारी पदासाठी उमेदवार मिळत नसल्याने पालिका प्रशासनकडून डॉ.डांगे यांच्याकडे अतिरिक्त पदभार कायम ठेवण्यात आला होता. त्यांचा अतिरिक्त पदभार अखेर काढून घेण्यात आला आहे. अलीकडे पालिकेच्या आरोग्य विभागात झालेल्या पदभरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप होत असून डॉ. डांगे यांचा पदभार काढून घेण्यामागे हे देखील कारण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.


ताज्या बातम्या