Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
खंडणीची मागणी करणारे तिघे गजाआड; व्यापा-याकडून मागितली होती ५ लाखाची खंडणी ...

दि . 25/03/2019

मालेगाव - मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गोल्डननगर पावर हाउस जवळ राहणारे व्यापारी अन्सारी सउद यासिर अब्दुल कुद्द्स यांच्याकडून दि २१ मार्च रोजी रात्रीच्या सुमारस अज्ञात इसमाकडून ५ लाख रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघा खंडणीखोरांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, एक देशी बनावट पिस्टल, तीन जिवंत काडतूस, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी दिली. 

पवारवाडी पोलीस ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत निलोत्पल यांनी या गुन्ह्याविषयी अधिक माहिती दिली. यावेळी पोलीस उपअधिक्षक रत्नाकर नवले, पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पो निरीक्षक शकील शेख आदी उपस्थित होते. दि. २१ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी अन्सारी यांना अनोळखी इसमाने फोन करून व एक पाकीट त्यांच्या घराचे दराजवळ ठेवून त्यांच्याकडे पाच लाख रु. खंडणीची मागणी केली होती. या पाकिटात एक जिवंत काडतूस, उर्दू भाषेतील चिठ्ठी होती. तसेच पोलिसात तक्रार केल्यास आम्ही तुमच्या मुला बाळांचे बरेवाईट करू असा दम दिला होता. 

याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहा. पो निरीक्षक शकील शेख, पोलीस हवालदार सचिन धारणकर , सुरेश बाविस्कर , पोलीस नाइक भरत गांगुर्डे, नवनाथ शेलार, सचिन भामरे , राकेश जाधव , अंबादास डामसे आदींच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला. यात आरोपी अबुजर शकील अहमद ( वय, २१ रा. इस्लामपुरा ), शिष महोम्मद उमर अन्सारी ( वय २० रा.खुशामतपुरा) व मोहम्मद अनस अन्सारी अब्दुल रब ( वय २६ रा. इस्लामपुरा) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून खंडणीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल असून आरोपींना दि २७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्यापा-याकडून खंडणी मागितल्याच्या घटनेने शहरात खळबळ माजली होती. पोलिसांना चार दिवसात या खंडणीखोरांना गजाआड करण्यात यश आले आहे.


ताज्या बातम्या