Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळे लोकसभेची उत्सुकता..भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीबाबत मात्र नागरिकांची उत्सुकता शिगेला..

दि . 16/03/2019

लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा होण्याआधीच भाजपा व काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा बिगुल पक्षाचे प्रमुखांचे उपस्थितीत धुळे शहरात फुुंकला गेला. परंतु ज्या मतदार संघातुन प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला त्या धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीबाबत मात्र नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पुलवामा हल्ल्याआधीच प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचा प्रचारांचा प्रारंभ धुळे लोकसभा मतदार संघातुन होणार आणि त्याची तारीख देखील ठरलेली होती. परंतु 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यानंतर 16 तारखेची प्रधानमंत्र्यांची सभा रद्द होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ती सभा प्रधानमंत्र्यांनी घेतली. आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचीही सभा धुळे शहरातच घेण्यात आली. देशातील सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आणि विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या दोघांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीचा बीगुल धुळे शहरातुन फुंकला. त्यामुळे भाजपा तर्फे विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे नावाची चर्चा सुरू झाली. भाजपासाठी लोकसभा मतदार संघातुन कोणीही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दाखविले नाही. किंबहुना कोणीही आपण इच्छुक आहोत म्हणून पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली नाही. त्यामुळे धुळे लोकसभा मतदार संघात भाजपा तर्फे ना.डॉ.सुभाष भामरे यांचेच नावाची चर्चा काल परवा पर्यन्त सुरू होती. परंतु काँग्रेस पक्षात माजीमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचेसह मालेगाव येथिल डॉ.तुषार शेवाळे यांचे नाव पहिल्या पासून चर्चेत राहिले. डॉ.शेवाळे हे मालेगाव शहराचे नेतृत्व करतात. नाशिक जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आहेत. शिवाय ते नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मराठा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत. या संस्थेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या जवळपास दहा हजारांचे घरात आहे. शिवाय डॉ.तुषार शेवाळे हे नाव अचानकपणे चर्चेत आले नाही तर मागील दोन वर्षापासून त्यांचे नावाची चर्चा होती. जलशिवार योजनेसाठी त्यांनी गेल्या दोन वर्षात अनेक कामे दोन्ही जिल्हयात केली आहेत. माजीमंत्री रोहिदास पाटील यांना आ.अमरिश पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, राष्ट्रवादीचे मा.आ.राजवर्धन कदमबांडे यांनी जाहिर पाठिंबा दिल्याने काँग्रेस पक्षातर्फे केवळ दोनच नावांची चर्चा शिल्लक राहिली. परंतु डॉ.तुषार शेवाळे यांनी आपले प्रयत्न दिल्लीश्वरापर्यन्त सुरू ठेवल्याने तरूण उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळावी असा दावा त्यांनी पक्षश्रेष्ठीसमोर केलेला आहे. त्याच प्रमाणे राहुल गांधी यांच्या सभेत आ. कुणाल पाटील यांनी जे आक्रमक भाषण केले त्यामुळे राहुल गांधी यांच्या मनात आ. कुणाल पाटील यांना संधी देण्याचा विचार असल्याची चर्चा मागील दोन दिवसात जोर धरू लागली आहे. म्हणजे खासदार म्हणून एक युवा नेतृत्व पक्षाला पुढील काळासाठी उपयुक्त ठरेल असा एक सुर या निमित्ताने पक्षीय पातळीवर आहे. म्हणजे पटेल विरूध्द पाटील यामुळे मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवार आ. अमरिश पटेल यांचा झालेला पराभव लक्षात घेता यावेळी मराठा विरूध्द मराठा असा सामना रंगणार आहे. पंरतु त्यासाठी माजीमंत्री रोहिदास पाटील, आ. कुणाल पाटील की डॉ.तुषार शेवाळे यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. आणि शेवटच्या क्षणाला ए.बी.फार्म देण्याची काँग्रेसची परम्परा यावेळीही कायम राहिल असे चित्र सध्या तरी दिसते आहे. अशाच प्रकारची परिस्थिती केंद्रीयमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांचे संदर्भात निर्माण झाली आहे. आपल्या उमेदवारीसाठी ना.डॉ.सुभाष भामरे दिल्लीत ठाण मांडून बसले असले तरी, भाजपाच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव येण्याची शक्यता दिसत नाही. त्यासाठी अनेक कारणे जनतेत चर्चेत आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे धुळे लोकसभेसाठी भाजपाचे ? आमदार अनिल गोटे यांनी ना.भामरे यांचे विरोधात आपली लोकसभेची उमेदवारी असेल अशा आशयाचे वृत्त प्रसारीत केले आहे. अर्थात हे वृत्त अधिकृत आहे किंवा नाही याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ना.डॉ.भामरेचा पराभव हेच माझे ध्येय असल्याचे या वृत्तात असल्याने तसे जर खरोखर असे घडले तर मात्र ना.डॉ.सुभाष भामरेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राज्यात भाजपा पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या वाढल्याने आणि दुसर्‍या पक्षातुन उमेदवार उचलण्याची भाजपाची तयारी असल्याने पक्षातील उमेदवार नाराज होणार्‍यांची संख्या वाढणार आहे. अशा पार्श्वभूमिवर राज्यात एकेक खासदार कसा निवडून येईल यावर भाजपाचा जोर असणार आहे. त्यामुळे धुळे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवारी बाबत जनतेतील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. माजीमंत्री रोहिदास पाटील यांना वयाच्या मुद्यावरून उमेदवारी  नाकराली तर आ. कुणाल पाटील उमेदवारी घेतील काय? असा प्रश्न आहे. कारण त्यांचा आमदारकीचा सुरक्षित मतदार संघ ते सोडण्यास तयार होणार नाहीत. मग डॉ.तुषार शेवाळेंना उमेदवारी दिली जाईल का ? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. तर केंद्रीय मंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांचे नंतर ना. जयकुमार रावल आणि युवा नेतृत्व म्हणून डॉ.माधुरी बोरसे या दोन नावांची चर्चा सुरू झाली आहे. परंतु ना. रावल आपला सुरक्षित मतदार संघ सोडणार नाहीत. शिवाय मराठा उमेदवारच भाजपा तर्फे देण्यात येईल. त्यामुळे डॉ.माधुरी बोरसे यांचे सारख्या नवा चेहरा पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय धुळे लोकसभा मतदार संघात साडेतिन लाख जे नवे मतदार नोंदले गेले आहेत ते विशीतले असल्याने त्यांचा कल हा भाजपाकडे असणार असे सध्यातरी चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाची चर्चेत असलेले दोन्ही नावे मागे पडत असून नवीन (तरूण) मराठा चेहर्‍यांचा शोध सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आ. कुणाल पाटील विरूध्द डॉ.माधुरी बोरसेअशा तरूण चेहर्‍यांची लढत होईल का  ? अशी उत्सुकतापूर्ण चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे. घोडा मैदान जवळ आहे. पाहुया काय होते ते.


ताज्या बातम्या