Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दिंडोरी मतदार संघाची दिंडोरीचे उमेदवार जाहीर पण अंतर्गत गटबाजीची चर्चा सुरू..

दि . 15/03/2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पाच उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये दिंडोरीतून धनराज महाले यांना तिकीट देण्यात आलं. पण, राष्ट्रवादीला अंतर्गत वादाचा फटका बसणार का? अशी चर्चा दिंडोरीमध्ये सुरू झाली आहे. दिंडोरीतून भारती पवार यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण, प्रत्यक्षात मात्र धनराज महाले यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे नाराज भारती पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्तापर्यंत 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये सुनील तटकरे- रायगड, सुप्रिया सुळे - बारामती, उदयनराजे भोसले - सातारा, आनंद परांजपे - ठाणे, गुलाबराव देवकर - जळगाव, राजेंद्र शिंगणे - बुलढाणा, राजेश विटेकर - परभणी, संजय दिना पाटील- ईशान्य मुंबई, बाबाजी पाटील - कल्याण, धनंजय महाडिक - कोल्हापूर, समीर भुजबळ- नाशिक, डॉ.अमोल कोल्हे - शिरुर, धनराज महाले - दिंडोरी, पार्थ पवार, मावळ आणि बजरंग सोनवणे - बीड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

पवारांची नाराजी भारती पवारांना भोवली?

काही दिवसांपूर्वी भारती पवार यांनी एका सभेदरम्यान शरद पवारांच्या उपस्थितीत कौटुंबिक कलहामुळे माझं तिकीट कापलं जाऊ नये. 2014मध्ये मी केवळ काही मतांनी पडले होते असं जाहीर विधान केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज झाले. त्याचाच फटका हा भारती पवार यांना बसल्याचं बोललं जात आहे. उमेदवारीबाबत अनिश्चितता वाटताच भारती पवार यांनी भाजपमध्ये चाचपणी करत राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

यावर बोलताना भाजपच्या सूत्रांनी हरीश्चंद्र चव्हाण हे निष्ठावंत आणि जेष्ठ नेते असून त्यांचं तिकीट कापण्याचा संबंधच येत नाही असे मत आहे.

दरम्यान,सुप्रिया सुळे यांनी भारती पवार यांना मुंबईला बोलावत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.शिवाय त्यांना आगामी विधानसभेकरता उमेदवारी दिली जाण्याची देखील शक्यता आहे.


ताज्या बातम्या