Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शिवबंधन काढून घड्याळ घातल्यानंतर डॉ. अमोल कोल्हेंची मालिका विश्‍वातून विश्रांतीची घोषणा

दि . 12/03/2019

शिवबंधन तोडून हाताला घड्याळ बांधल्यानंतर राजकीय पटलावर चर्चेत आलेल्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येत्या काही काळासाठी मालिका विश्‍वातून विश्रांतीची घोषणा करीत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिलेत. 

श्री सयाजी सृष्टीतर्फे सोमवारी मालेगावी श्री सयाजी जन्मोत्सव सोहळा आयोजित केला होता. त्यात सयाजीरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त घोषणा केली. सोहळ्यात काही मान्यवरांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’प्रमाणे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट जनतेसमोर आणण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी ‘स्वराज्यरक्षक’च्या धर्तीवर महाराजा सयाजीरावांच्या जीवनावर एखादी मालिका, नाटक, चित्रपट करण्याचा प्रयत्न करिन मात्र तसा थेट शब्द देत नाही. कारण छत्रपतींच्या संस्कारातून दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय थांबायचे नाही, अशी सवय लागली आहे. तरी ‘स्वराज्यरक्षक’ मालिका पूर्ण झाल्यानंतर काही काळासाठी मालिका क्षेत्रातून वैयक्तिक मी विश्रांती घेणार असल्याचे सांगत या घोषणेची पत्रकारांनी खास करून नोंद घ्यावी, असे सांगितले. त्यांचा संकेत लोकसभा निवडणुकीकडे अंगुलिनिर्देश करणारा ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याच्या दुसर्‍याच दिवशी डॉ. कोल्हे पुरस्कार सोहळ्यानिमित्त मालेगावी आले होते. तत्पूर्वीच, त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते शिरुर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी करणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांमधून केलेल्या संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीत डॉ. कोल्हेंना अधिक पसंती मिळाल्याचे ज्येष्ठनेते अजित पवार यांनीच काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी मालिका क्षेत्रातून अल्पशा विश्रांतीची केलेली घोषणा त्यांची ‘राष्ट्रवादी’कडून उमेदवारी निश्‍चित झाल्याचेच संकेत मानले जात आहेत.

 


ताज्या बातम्या